कोल्हापूर : प्रतिनिधी
हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी मतदारांना साद घातली. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर हातकणंगले मतदारसंघाच्या मतदान तारखेचा उल्लेख करत म्हटले की, ‘७ मे सर्व जण ७ द्या’, असे आवाहन शेट्टी यांनी केले. त्यांच्या आवाहनाला मतदारसंघातील नागरिक कशाप्रकारे प्रतिसाद देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
हातकणंगले मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही.
त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी, असा आग्रह भाजपकडून सुरू आहे. हा मतदारसंघ यापूर्वी दोनवेळा भाजपने लढवला आहे. त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत.