पुणे : प्रतिनिधी
यंदा दरवर्षीच्या तुलनेत आंब्याचा हंगाम काहीसा लवकर सुरू झाला आहे. उत्पादनही चांगले आहे, त्यातच तुलनेने काहीसे भावही कमी असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. सद्य:स्थितीत रत्नागिरी हापूसची आवक दोन ते तीन हजार पेट्याइतकी दररोज होत आहे.
यामध्ये येत्या दोन -तीन दिवसांपासून आंब्याची आवक आणखी वाढेल. १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटकाही आंब्याला बसला आहे. सद्य:स्थितीत दर्जानुसार ४ ते ८ डझनाच्या पेटीला ३ ते ७ हजार रुपये इतका दर मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या आंब्याची आवक वाढत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोकणात आंब्याला हवामान पोषक असल्याने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर अरब देशातून चांगली मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेतूनही मागणी वाढली आहे.
हंगामात इथून पुढे हवामानाचा फटका बसला नाही तर यावर्षी हापूसचे दर आणखी आवाक्यात येतील असा अंदाज आहे. पाडव्यानंतर दर कमी होत जातील असेही व्यापा-यांकडून सांगण्यात येत आहे.