मॉस्को : रशियामध्ये पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन सत्तेमध्ये आले आहेत. रशियातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते विजयी झाल्याने सहा वर्षे आणखी ते सत्तेत राहतील. त्यांना तब्बल ८७ टक्के मते मिळाली आहेत. ‘द गार्डियन’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
रशियाच्या निवडणुकीत पुतिन यांचाच विजय होईल अशीच शक्यता होती. कारण, त्यांच्यासमोर कोणी तगडा प्रतिस्पर्धी नव्हता. जे काही विरोधी नेते होते ते परदेशात होते किंवा त्यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुतिन यांना आव्हान देणारे कोणी समोर नव्हते. त्यामुळे त्यांचा विजय औपचारिकता होती. पुतिन यांच्याकडे गेल्या २५ वर्षांपासून रशियाची सूत्रे आहेत.
रशियात पुतिन यांच्या हुकूमशाही विरोधात लोकांनी तीव्र आंदोलन केले होते. अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. पण, त्यांचे आंदोलन चिरडण्यात आले आहे. पाश्चिमात्य देशातील मीडियातून या निवडणुकांवर आक्षेप घेण्यात आला होता. रशियातील निवडणुका म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचे माध्यमातून म्हणण्यात आले होते. पण, पुतिन यांनी झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पुतिन यांनी आणखी सहा वर्षांसाठी सत्ता आपल्या हातात घेतली आहे. गेल्या २०० वर्षातील सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणारा नेता म्हणून व्लादिमीर पुतिन यांची ओळख आता होणार आहे.
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. युक्रेनने रशियाला थकवले असले तरी आता त्याची शक्ती कमी पडत आहे. युक्रेनला पश्चिमी देशांकडून मदतीची गरज आहे, पण हवी तितकी मदत मिळत नाही. रशियाच्या निवडणुकीत युद्धाचा मुद्दा देखील महत्त्वाचा होता. शिवाय पुतिन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांचा गूढ मृत्यू झाल्यामुळे पुतिन यांच्या विरोधात वातावरण होते. मात्र, त्याचा परिणाम निवडणुकीवर झालेला दिसत नाही.