जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पक्षांकडून उमेदवारांची नावेही जाहीर केली जात आहेत. भाजपने महाराष्ट्रात रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलीय. मात्र रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे.
खासदार रक्षा खडसे या भाजप कार्यकर्त्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जास्त मदत करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनात खडसे यांनी रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याआधी आपण रक्षा खडसे यांना राष्ट्रवादीकडून ऑफर दिली होती असेही म्हटले होते. पण रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांना स्पष्टपणे नकार दिला होता.
भाजपने देशात अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांचे तिकिट कापले आहे. बहुतांश खासदारांचा पत्ता कट करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली गेल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त करत राजीनामेही दिले आहेत.