25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रलेकीचा गळा कापून पित्याची आत्महत्या

लेकीचा गळा कापून पित्याची आत्महत्या

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. तसेच आठ वर्षीय मुलगी देखील घरात मृतावस्थेत आढळून आली. काळेवाडी येथे मंगळवारी (दि. १९) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.

भाऊसाहेब भानुदास बेदरे (४३, रा. गुरुनानक नगर, थेरगाव, मूळ रा. बेदरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ८), अशी मयतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेदरे कुटुंब उदरनिर्वाहासाठी १५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. भाऊसाहेब बेदरे खासगी नोकरी करत होते. काही महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने ते चारचाकी वाहन चालवत होते. मात्र त्यातूनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती.

दरम्यान, भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री गावाकडे गेल्या. सोमवारी (दि. १८) रात्री त्या गावाकडून निघाल्या. मंगळवारी पहाटे चार वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथे पोहोचल्यावर त्यांनी पती भाऊसाहेब यांना फोन केला. तुम्ही गाडी घेऊन या, असे त्यांनी भाऊसाहेब यांना सांगितले. मात्र, भाऊसाहेब आले नाहीत. त्यामुळे त्या घरी पोहोचल्या. त्यावेळी घरात झोपलेला त्यांचा १५ वर्षीय मुलगा आशिष याने दरवाजा उघडला. मुलगी नंदिनीला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. तसेच पती भाऊसाहेब यांनी स्वयंपाक खोलीत गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.

याबाबत माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भाऊसाहेब आणि नंदिनी यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR