नवी दिल्ली : दिल्लीत १३ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान होणारी सम-विषम योजना तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या दिल्लीत ऑड-इव्हन लागू होणार नाही, अशी माहिती पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली आहे. वास्तविक, पाऊस आणि वाऱ्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी सुधारली आहे. यानंतर सरकारने दिवाळीनंतर प्रदूषणाचा आढावा घेऊन त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असा निर्णय घेतला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. गेल्या ४८ तासांत हवा गुणवत्ता निर्देशांकावर (एक्यूआय) ५०० च्या आसपास असलेली प्रदूषण पातळी आता १७२ वर आल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी हवामान खात्याने शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.
अत्यंत गंभीर पातळी गाठल्यानंतर वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकार सम-विषम प्रणाली आणि कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत असताना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले होते की, प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी दिल्लीत २० ते २१ नोव्हेंबर दरम्यान कृत्रिम पाऊस पाडला जाईल. गतकाळातील प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेऊन दिल्ली सरकारने हिवाळ्याच्या सुट्या डिसेंबरऐवजी ९ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत बदलल्या आहेत.