नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या भेटीदरम्यान मनीष सिसोदिया मीडियाशी बोलू शकत नाहीत. राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांना मीडियाशी न बोलण्याच्या आणि राजकीय सहभाग न घेण्याच्या अटीवर भेटण्याची परवानगी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती लोकूर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, जामीन मंजूर करणे किंवा नाकारणे या मूलभूत तत्त्वांचा न्यायालयांना विसर पडल्याचे दिसते. यासोबतच आरोपींना तुरुंगात ठेवण्यासाठी अपूर्ण आरोपपत्र दाखल करणे आणि कागदपत्रे न देणे यासारख्या तपास यंत्रणांच्या हेतूकडे लक्ष देण्याची न्यायपालिकेची अनास्था अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत. यानंतर ईडीने त्यांना ९ मार्चला अटक केली. अबकारी धोरणाशी संबंधित एका प्रकरणात सीबीआय आणि ईडीने त्यांना अटक केली आहे. सध्या दोन्ही एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मनीष सिसोदिया यांनी २८ फेब्रुवारी रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता.