छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना शासनाच्या वतीने कुणबी नोंदी असणा-यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणीचे पुरावे आणायचे कुठून? असा प्रश्न असताना, सिल्लोड तालुक्यातील कन्नड रस्त्यावर असलेल्या धानोरा गावातील एकाने अडगळीत पडलेली ट्रंक उघडली. या ट्रंकेत जीर्ण झालेली कागदपत्रे आढळली. त्यावरील धूळ झटकली असता, त्यामध्ये निजामकालीन उर्दू भाषेत व देवनागरी भाषेत महसुली नोंदीचा खजाना सापडला. यामुळे अख्ख्या गावाच्या नोंदी आढळून आल्याने गावक-यांच्या भावी पिढ्यांचे कल्याण झाले असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज लढतो आहे. न्यायालयीन लढाई लढल्यानंतर समाजाने रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आता आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्यानंतर नोंदी असणा-यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, शासनाने सुरू केलेल्या प्रमाणपत्र वाटप योजनेतून प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदी आणायच्या तरी कुठून? असा प्रश्न असंख्य मराठा समाजाच्या बांधवांसमोर आहे.
असाच प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या धानोरा गावच्या गावक-यांसमोर उपस्थित झाला. कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी नोंदी सोडण्यासाठी या गावक-यांनी देखील शोधाशोध सुरू केली. यावेळी सोमीनाथ काकडे यांनी घरामध्ये अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या ट्रंकेत उघडून बघितले असता, त्यामध्ये कागदपत्रांचा गठ्ठा आढळून आला. या कागदपत्रांवरील धूळ झटकून बघितली असता, यामध्ये निजामकालीन उर्दू भाषेत तसेच देवनागरी भाषेत भाषांतर केलेल्या काही महसूल नोंदीचा खजाना हाती लागला. यावेळी संपूर्ण कागदपत्र तपासले असता यामध्ये संपूर्ण गावाचा नोंदींचा खजिना समोर आला.