तेलअवीव : गाझामध्ये सुरू असलेले हल्ले मानवतावादी दृष्टिकोनातून दररोज चार तास थांबवण्यावर इस्रायलने सहमती दर्शवली होती. यादरम्यान गाझा पट्टीत राहणा-या पॅलेस्टिनींना मदत देण्याची चर्चा होती; मात्र २४ तासांच्या युद्धविरामानंतर इस्रायलने पुन्हा हल्ले सुरू केल्याने हजारो लोकांसमोर संकट उभे राहिले आहे, जे आपला जीव वाचवण्यासाठी गाझातून पळून जाणार होते. इस्रायलने गाझामधील तीन रुग्णालयांवर हवाई हल्ले केले आहेत.
यामुळे बेघर झाल्यानंतर येथे आश्रय घेतलेल्या १४ हजार लोकांसमोर आता संकट निर्माण झाले आहे, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. यादरम्यान एक मशीद पाडल्याचा व्हीडीओ वायरल झाला आहे. व्हीडीओमध्ये इस्रायली हल्ल्यात मशीद पूर्णपणे उध्वस्त होत असल्याचे दिसते. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिका-याने अल-जझीरा टीव्हीला सांगितले की, गेल्या काही तासांत इस्रायलमधून अनेक रुग्णालयांवर भीषण हल्ले झाले आहेत. पॅलेस्टाईनमधील स्थानिक वृत्तपत्रांनीही अल शिफा रुग्णालयावरील हल्ल्याचे वृत्त दिले आहे. त्याचवेळी इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, आम्ही हॉस्पिटलवर हल्ला केला आहे, मात्र स्थानिक नागरिक त्यात लपून बसलेले नव्हते.
इस्रायली लष्कराने सांगितले की, हमासच्या दहशतवाद्यांनी अल-शिफासह अनेक रुग्णालयांमध्ये तळ उभारले आहेत. ही ठिकाणे नष्ट करण्यासाठी आम्ही हल्ले करत आहोत. आम्हाला नागरिकांना लक्ष्य करायचे नाही. आम्ही लोकांना इजिप्तच्या दिशेने जाण्यासाठी वेळ दिला, असे इस्रायलने म्हटले आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने आता गाझा शहरात प्रवेश केला आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या संख्येने इस्रायली सैनिकांनी आता गाझामधील महत्त्वाच्या सुविधांना वेढा घातला आहे.