धाराशिव : सुभाष कदम
जिद्द व चिकाटीच्या जोरावर तसेच आई-वडील व मोठ्या भावाच्या कष्टाची जाणीव ठेवून शिंदेवाडी (केशेगाव) ता. धाराशिव येथील शेतकरी पुत्राने पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. गणेश हणुमंत शिंदे असे या जिद्दी तरूणाचे नाव आहे. कोणताही क्लास न लावता केवळ स्वअध्ययन करून गणेश शिंदे यांनी हे यश मिळविले आहे.
शिंदेवाडी हे धाराशिव तालुक्यातील केशेगाव जवळील जेमतेम ५० उंबरा असलेले गाव आहे. शिंदेवाडी-केशेगाव या दोन्ही गावची मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. शिंदेवाडी येथील शेतकरी हणुमंत शिंदे यांना योगेश व गणेश अशी दोन मुले व एक विवाहीत मुलगी आहे. योगेश शिंदे यांनी जेमतेम बारावीचे शिक्षण घेऊन शेती व व्यवसाय सांभाळत आहेत. गणेश शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण धाराशिव शहरातील नूतन प्राथमिक शाळेत व श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये झाले. आठवी ते दहावीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भूवन प्रशालेत झाले. अकरावी व बारावी संभाजीनगर येथीलच विवेकानंद महाविद्यालयात झाली. अभियांत्रिकीचे शिक्षण नांदेड येथील शासकीय गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले.
अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर गणेश शिंदे यांनी अभियंता म्हणून नोकरी केली नाही. शेतकरी पूत्र असल्याने त्यांना प्रशासनात येऊन जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी पुणे येथे अभ्यास सुरू केला. कोणताही क्लास न लावता स्वअध्ययन करून पहिल्याच प्रयत्नात ते पोलीस उपनिरिक्षक झाले. सध्या ते गडचिरोली येथे कार्यरत आहेत. एवढ्यावरच गणेश यांनी समाधान न मानता त्यांनी परत अभ्यास सुरू केला. तहसीलदार किंवा डीवायएसपी पोस्ट काढण्यासाठी परिश्रम घेतले. परत राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली.
केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर तसेच आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत त्यांची राज्यातून ४१ व्या रँकने पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. ते सध्या गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात पोलीस उपनिरिक्षकपदी कार्यरत आहेत. गणेश शिंदे यांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याची बातमी गावात धडकताच शिंदेवाडी, केशेगाव, धाराशिव येथील मित्र परिवार, नातेवाईकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
ग्रामीण भागातही टॅलेंट
ग्रामीण भागातील मुले कशातच कमी नाहीत, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे. त्यांनी आपण ग्रामीण भागातले असल्याचा न्युनगंड प्रथम काढून टाकावा. कोणतेही काम मन लावून केल्यास यश हमखास मिळते. आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून तरूणांनी कष्ट घ्यावे. क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रात जीव ओतून कष्ट घेतल्यास अपयश जवळही फिरकत नाही, असे नूतन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांनी सांगितले.