नवी दिल्ली : भाजपकडून एकीकडे २० उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तर महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या (गुरूवारी) मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि मग जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात काँग्रेस १८ जागांवर निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दिल्लीत आज (बुधवारी) काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील यांचा समावेश होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात ४८ पैकी १८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
शरद पवार आणि ठाकरे गट ३० जागांवर लढणार?
काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची जवळपास पाऊण तास बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात १८ जागांवर निवडणूक लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. ३० जागांचे गणित राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडवावा लागणार आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.
शिंदे
१८ उमेदवारांमध्ये २ महिला
काँग्रेसच्या या १८ उमेदवारांमध्ये २ महिला उमेदवारांचा समावेश आहे. चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. इतर नावांची यादी कदाचित उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाऊ शकते.
निश्चित झालेले उमेदवार असे…
पुणे – रवींद्र धंगेकर, गडचिरोली – नामदेव किरसंड, सोलापूर – प्रणिती शिंदे, नंदुरबार – गोवाल पाडवी, अमरावती – बळवंत वानखेडे, कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती, नागपूर- विकास ठाकरे.