मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन ४ दिवस उलटल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत युती होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप अडून बसले आहे. महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर आपापल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आघाडीच्या शक्यता जवळपास मावळल्या आहेत.
यापूर्वी महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर प्रकाश आंबडेकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते. परंतु त्यामुळे मविआ आणि वंचितच्या युतीबाबत काही ठोस घडू शकले नव्हते. त्यातच आता महाविकास आघाडीकडून गुरुवारी मुंबईत लोकसभा जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक ठेवण्यात आली आहे. जागावाटपाच्या दृष्टीने ही शेवटच्या टप्प्यातील बैठक आहे. मात्र, वंचितला या बैठकीचे निमंत्रण नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीने वंचितची आशा सोडून चर्चेला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
याबाबत वंचित आघाडीकडे विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, अद्याप आम्हाला मविआकडून बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही. वंचित अजूनही निमंत्रण मिळेल, यासाठी सकारात्मक आहे. निमंत्रण मिळाले तर उद्याची बैठक आणि पत्रकार परिषदेला वंचित आपला प्रतिनिधी पाठवेल. उद्याच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत. आंबेडकर उद्या बैठकीऐवजी अकोल्यात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतील, असे वंचितकडून सांगण्यात आले. त्यामुळे उद्या मविआच्या बैठकीत काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ही बैठक सुरु असताना मध्येच वंचितच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले जाईल का, हे बघितले जाईल. तसे न घडल्यास महाविकास आघाडीने वंचितला सोबत न घेता पुढे जायची तयारी केल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे उद्याच वंचित आणि महाविकास आघाडीतील संबंधांचे भविष्य ठरण्याची शक्यता आहे.
आज अंतिम बैठक
२१ मार्चला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागा वाटपाची अंतिम चर्चा होऊन फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार आहे.
काही जागांवरून मतभेद
मविआने लोकसभेसाठी २२-१६-१० हा फॉर्म्युला निश्चित केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चार ते पाच जागांबाबत अद्याप एकमत न झाल्याने मविआतील पक्षांनी अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. अशातच सांगली लोकसभेत उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना, कॉंग्रेसमध्ये वाद वाढला आहे. यावर उद्या तोडगा काढला जाऊ शकतो.