मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून एनसीपी-एसपीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. घाव सोसाव्या लागणा-या पित्यासाठी संघर्ष करणा-या सुप्रिया सुळे या जिजाऊंची लेक आहेत, असे त्यांनी रुपाली चाकणकर यांना सुनावले आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत भाषण केले होते. त्या भाषणात त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ‘लेकीने माहेरी लुडबूड करू नये’ अशा आशयाचे वक्तव्य केले होते. याबद्दल राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. असे वक्तव्य करून रुपाली चाकणकर यांनी तमाम स्त्रीवर्गाचा अपमान केला आहे. आजच्या काळात स्त्री-पुरुषांमध्ये भेद राहिला आहे कुठे?
एनसीपी-एसपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना दिलेले ५० टक्क्यांचे आरक्षण कशासाठी दिले होते? महिलाही पुरुषांइतक्याच कर्तबगार असतात आणि त्यांची कर्तबगारी सिद्ध करता यावी, या भावना शरद पवार यांच्या होत्या आणि आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या मदतीसाठी, त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी सुप्रिया सुळे लढत असतील, संघर्ष करीत असतील तर त्यास ‘लुडबूड’ म्हणून संबोधल्याने रुपाली चाकणकर यांच्या बुद्धीचीच कीव येते, असा टोला त्यांनी लगावला आहे. केवळ मुलगी आहे अन् ती सासरी गेली आहे, म्हणून तिचा माहेरचा अधिकार नाकारणे, हा प्रकार राजर्षि शाहू महाराज आणि जोतिराव फुले-सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा अपमानच आहे. त्यामुळे आपले असे विचार असतील तर यापुढे किमान महात्मा जोतिबा आणि सावित्रीमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार तरी अर्पण करू नका, असेही त्यांनी सुनावले आहे.
मुलगी आहे, म्हणून तिचे अधिकार नाकारणा-या जमान्यातील तुम्ही आहात. पण, आमच्यासारखे वंशाला दिवा आहे किंवा नाही, असा विचार न करता, एका मुलीवरच समाधान मानून तिलाच सर्व अधिकार देणारे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगून आव्हाड म्हणाले की, ज्या मुलीच्या बापाने (शरद पवार) आपुलकीने ज्या स्वकियांना आणि परकियांना मोठे केले आणि ज्यांना मोठे केले त्यांच्याकडूनच ‘तिच्या’ पित्याला घाव सोसावे लागत आहेत; अशा वादळात, रणसंग्रामातही सुप्रिया सुळे समर्थपणे संघर्ष करीत आहेत. ही जिजाऊंची लेक आहे, ही अबला नारी नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
सासर आणि माहेर या कल्पना आता इतिहासजमा झाल्या आहेत. दुर्दैवाने महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाही आपण अशा भेदभावाच्या भावना बाळगत असाल तर स्त्री अत्याचाराविषयी आपल्या काय भावना असतील, याचा विचारच न केलेला बरा, असेही त्यांनी सुनावले आहे.