लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी पडलेला असला तरी लातूर शहरासह जिल्ह्यात डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी संशयीत डेंग्यू आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत जिल्ह्यात २ हजार ११ संशयीत डेंग्यू तापीचे रुग्ण आढळले आहेत. यातील ८१३ रुग्ण लातूर शहरातील तर ११९८ रुग्ण शहराबाहेरील आहेत. दरम्यान नागरीकांनी पाणीसाठे झाकुन ठेवावेत, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचा डंख वाढतो आहे. डेंग्यूचा विळखा वाढत चालला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत संशयित डेंग्यू झाल्याचे ३६ रुग्ण आढळले ओहत. तर चिकुनगुनियाच्या ४ रुग्णांचा समावेश आहे. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत संशयित ताप आजारामुळे चौघांचा मृत्यू झालेला आहे. या चारपैकी तीन रुग्णांचा अहवाल नांदेड येथील सेंटेनल सेंटर येथून निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे ते डेंग्यू तापाीचे मृत्यू नाहीत., असे लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने डेंग्यू तापीचे संशयित रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी आपल्या घरातील सर्व पाणीसाठे घट्ट झाकुन ठेवावेत. फुलदाणी, फ्रि जच्या ट्रेमधील पाणी नियमितपणे बदलावे, दारे, खिडक्या यांना जाळ्या बसून घ्याव्यात, पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत, ताप आल्यावर अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरीत रक्त तपासणी करावी, औषधोपचार करुन घ्यावेत, असे आवाहन लातूर शहर मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.