लातूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षण सत्कारणी लावावा. तरच तो चांगला नागरिक होवू शकतो. चांगल्या सवयी, छंद लावून घेतले तर वाईट व्यसन लागणारच नाही. व्यसन करा पण ज्ञान मिळविण्याचे, स्वत:ला घडविण्याचे, चांगल्या कामाचे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, व्यसन लागते हे सांगून ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हा मोलाचा सल्ला प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
भारताचे आधारस्तंभ ही युवा पिढी आहे. युवक शारीरिक दृष्ट्या कणखर व मानसिक दृष्ट्या खंबीर असावा यासाठी त्यांनी दुर्व्यसनांना नाही म्हटले पाहिजे. व्यसन म्हणजे काय ? कोणत्या चांगल्या गोष्टींचे असावे याची, सांगोपांग चर्चा करण्यासाठी व व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम सांगून युवकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी कृषि महाविद्यालय, लातूर मार्फत आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. यावेळी माणुस प्रतिष्ठान, लातूरचे अध्यक्ष शरद झरे, डॉ. पद्माकर वाडीकर, विनोद चव्हाण उपस्थित होते.
यावेळी आदित्य गवळी या स्वयंसेवकाने सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहण्याची उपस्थितांना शपथ
दिली. यावेळी झरे म्हणाले, व्यसनमुक्ती व देशाला महासत्ता बनवणे हा माझा ध्यास आहे. फास्ट फूड, धूम्रपान, मद्यपान या व्यसनांमुळे युवा वर्गात कॅन्सर, मधुमेह, डोळे निकामी होणे, हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे.म्हणून बाळांनो स्वत:चा, माता-पित्यांचा विचार करा आणि व्यसनांपासून लांब राहा, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. यावेळी डॉ. वाडीकर म्हणाले की, छंद चांगला आहे. परंतु व्यसन वाईटच.’ कृषि व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे’ म्हणूनही कृषिच्या तरुणांची जबाबदारी मोठी आहे असे ते म्हणाले. विनोद चव्हाण यांनी दूरचीत्रवाणी, भ्रमणध्वनीचा वाढता वापर ही चिंतेची बाब आहे. भ्रमणध्वनीच्या व्यसनामुळे युवा पिढीत मनोरुग्ण वाढत आहेत. म्हणून तुम्ही वेळीच सावध व्हा हा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत शिंदे यांनी, सूत्रसंचालन नेहा आरगडे, स्रेहल सोलवट यांनी तर आभार प्रदर्शन हर्ष भंसाळी याने केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे, ग्रामस्थ युवक, युवती उपस्थित होते.