31.5 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रशाहू महाराजांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे मैदानात

शाहू महाराजांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे मैदानात

कोल्हापुरात घेणार जंगी सभा

कोल्हापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून यावेत, यासाठी उद्धव ठाकरे ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. येत्या २ मे रोजी उद्धव ठाकरे कोल्हापुरात जंगी सभा घेणार आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात सभा घेण्याचे ठरविले आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्लान उद्धव ठाकरेंनी आखला आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीकडे आहे. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा जवळपास पावणेतीन लाख मतांनी पराभव केला होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय मंडलिक यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली आहे. काँग्रेसने या जागेवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, संजय मंडलिक यांना शह देण्यासाठी आणि शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे २ मे रोजी कोल्हापुरात जंगी सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेनंतर ३ मे रोजी उद्धव ठाकरे कणकवली मतदारसंघात सभा घेणार आहेत. कणकवलीतून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR