25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकडक उन्हात प्रचाराचे ‘रण’ तापणार!

कडक उन्हात प्रचाराचे ‘रण’ तापणार!

उमेदवार, इच्छुकांकडून भेटींवर भर

पुणे : प्रतिनिधी
एकीकडे उमेदवारी निश्चितीवरून इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणा-या ठरत आहेत. मार्चअखेर कमाल तापमान ४० अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, इच्छुक तसेच कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे.

गेल्या काही वर्षांत राज्याला ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा चांगलाच फटका बसत आहे. मार्च महिन्यात राज्यात पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. उन्हाच्या झळा जीव लाही लाही करणा-या ठरत आहेत. वाढते ऊन तापदायक ठरत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीचा फडही सजला आहे. लोकसभा निवडणूक घोषित झाली आहे. देशात सात टप्प्यांत, तर राज्यात पाच टप्प्यांत या निवडणुकीचे मतदान होत आहे.

सध्या उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडी, महायुतीतील उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष कायम आहे. आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना उन्हाचा वाढता तडाखा प्रचाराचे रण अधिकच तापवणारा ठरणार आहे.

दुपारी मोठ्या प्रमाणावर ऊन असल्यामुळे भल्या पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात केली जात आहे. दुपारी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा प्रचार केला जात आहे. भर उन्हातही युतीचे कार्यकर्ते घरोघरी फिरून केंद्र व राज्य शासनाने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवित आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाचा तडाखा अधिकच वाढणार आहे. अशा परिस्थितीत प्रचारासाठी घराबाहेर पडताना कार्यकर्त्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

टोप्या, उपरणे आणि छत्र्या
वाढते ऊन लक्षात घेता, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना टोप्या, उपरणे उपलब्ध करून दिले आहेत. या टोप्या तसेच उपरण्यांवरच पक्षाचे नाव, चिन्ह नमूद करण्यात आले आहे. या टोप्या, उपरण्यांद्वारेही प्रचाराची संधी राजकीय पक्षांनी सोडलेली नाही. उन्हापासून कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या ध्वजाच्या रंगांच्या छत्र्या तयार केल्या असून, या छत्र्यांवरही राजकीय पक्षांची चिन्हे छापण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR