श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दल तलावात शनिवारी (११ नोव्हेंबर) अनेक हाऊस बोटींना भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, सहा हाऊसबोट जळून खाक झाल्या आहेत. एसडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळावरून तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. हे मृतदेह बांगलादेशातील पर्यटकांचे असून त्यांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हाऊसबोटमध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणात आग लागली आणि ती वेगाने शेजारच्या अर्धा डझन हाउसबोटमध्ये पसरली. आगीत सहा हाऊसबोट आणि शेजारील लाकडी शेड जळून खाक झाले आहे. परिणामी एकूण ४० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्दैवी घटनेने तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हाऊसबोट घाट क्रमांक ९ च्या बाजूला होत्या. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी तासन्तास प्रयत्न करण्यात आला. आगीच्या घटनेनंतर तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पर्यटक बांगलादेशचे असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. काश्मीरमधील हाऊसबोट मालक आणि हाऊसबोट असोसिएशनने अधिकाऱ्यांना विशेषत: एलजी मनोज सिन्हा यांना या घटनेकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन केले आणि काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीची वेळ आल्याने मालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.