नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) अडचणी थांबण्याचे नाव नाही. आपचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी, आपचे तीन मोठे नेतेही तिहार कारागृहात आहेत. सीएम केजरीवाल यांना जामीन मिळाला नाही तर, त्यांनाही पुढील १४ दिवसांसाठी तिहार कारागृहातच रहावे लागणार आहे. त्यांना ईडीने २१ मार्चला अटक केली होती. अटक झाल्यापासून ते ईडीच्या कोठडीत होते. आता, केजरीवाल यांना तिहार कारागृह क्रमांक दोनमध्ये एकटे राहावे लागणार आहे. या कालावधीत त्यांना नाश्त्यात चहा आणि ब्रेड दिली जाईल. तसेच जेवणात पाच पोळ्या (चपात्या) दिल्या जातील.
तिहारमध्ये इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांची सकाळही ६:३० वाजल्यापासून होईल त्यांना नाश्त्यात चहा आणि ब्रेड दिले जाईल. सकाळी अंघोळीनंतर, केजरीवालांना न्यायालयात जायचे असेल तर, परवानगी दिली जाईल. या काळात ते आपल्या कायदे विषयक टीम सोबत चर्चाही करू शकतील. तिहारमध्ये त्यांना सकाळी १०:३० ते ११ दरम्यान भोजन मिळेल. यात दाळ, भाजी, पाच पोळ्या (चपाती) आणि भाताचा समावेश असेल.
याशिवाय केजरीवाल यांना इतर कैद्यांप्रमाणे, दुपारी ३.३० वाजता एक कप चहा आणि त्यासोबत दोन बिस्किट्स दिले जातील. सायंकाळी ४ वाजता आपल्या वकीलांना भेटायची परवानगी दिली जाईल. तिहारमध्ये रात्रीचे भोजन सायंकाळी साडे पाच वाजल्यापासूनच सुरू होईल. रात्रीही भोजनात, दाळ, भाजी, पोळी आणि भात मिळेल. महत्वाचे म्हणजे, तिहारमध्येच वेगवेगळ्या कारागृहात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन देखील कैद आहेत.