वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रत्येक राज्यांत जोरदार प्रचार सुरू केला असून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच प्रतिबिंब अमेरिकेतही पडले असून येथील भाजप समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिस-या टर्मला पाठिंबा व्यक्त करणा-या रॅली काढण्यास सुरुवात केली आहे.
ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी या संघटनेने अमेरिकेतील वीस शहरांमध्ये रॅली काढत नरेंद्र मोदी यांना समर्थन जाहीर केले. तसेच, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यंदाच्या निवडणुकीत चारशेपेक्षा अधिक जागा मिळवून द्याव्यात, असे आवाहनही या रॅलींमध्ये सहभागी झालेल्या भाजप समर्थकांनी केले. ‘अमेरिकेतील भारतीय समुदायाला यंदाच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता असून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर पाहण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे असे मत या संघटनेचे सरचिटणीस वासुदेव पटेल यांनी व्यक्त केले.
या संघटनेने वॉशिंग्टन, व्हर्जिनिया, मेरीलँंड, न्यूजर्सी, अटलांटा, जॉर्जिया या राज्यांमध्ये मोटार रॅली आयोजित केल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी किमान दोनशे मोटारी रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. भाजप समर्थकांच्या हातात मोदींचे पोस्टर, भाजपचे झेंडे दिसत होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जात होत्या. भाजप समर्थकांनी काढलेल्या या रॅलींवेळी भाषणेही करण्यात आली. यावेळी मोदी सरकारने देशाच्या विकासासाठी केलेल्या कामांबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, भारत-अमेरिका मैत्री दृढ करण्यासाठी आणि जगभरात शांतता निर्माण करण्यासाठी मोदींनी दिलेल्या योगदानाबद्दलही माहिती दिली गेली. अमेरिकेत लाखो भारतीय नोकरीनिमित्त राहात असून अनेक जणांनी मतदानासाठी भारतात येण्याचे नियोजनही केले आहे.