मुंबई : बंडखोरीचा धोंडा पायावर पाडून घेतलेल्या खासदार हेमंत गोडसे यांची सगळीकडून कोंडी झाली आहे. महायुतीने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. दुसरीकडे अन्य पक्षांनीही त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे खासदार गोडसे यांच्यापुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार गोडसे यांची उमेदवारी अनिश्चित आहे. पक्षनेत्यांकडून स्पष्ट संकेत मिळत नाहीत. त्यामुळे गोडसे यांचे समर्थक कोंडीत सापडले आहेत. काल सकाळी गोडसे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चाचपणी करून पाहिली.
त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क केला. मात्र दोन्ही ठिकाणाहून त्यांची निराशा झाली. गद्दारांना प्रवेश नाही.. या शब्दांत शिवसेनेच्या नेत्यांनी गोडसे समर्थकांना झुरळ झटकावे तसे दूर केले. त्यामुळे कालपर्यंत त्वेषाने लढण्याची भाषा करणारे गोडसे समर्थक यांच्यापुढे आता सर्व मार्ग बंद झाल्यासारखी स्थिती आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी काल शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार मेळाव्यात गौप्यस्फोट केला. बडगुजर म्हणाले, खासदार गोडसे यांचे निकटवर्तीय आबा बोराडे आपल्या काही सहका-यांसह माझ्याकडे आले होते. त्यांनी जे झाले ते विसरून आम्हाला पदरात घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र गद्दारांना शिवसेनेची दारे बंद झाली आहेत, असे स्पष्ट निर्देश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे गोडसे यांनी आता शांतपणे बसावे. राजकारण बाजूला ठेवून समाज व देशाच्या हितासाठी, शेतक-यांच्या समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार वाजे यांच्या पाठीशी उभे राहावे, अशा सूचना केल्या आहेत,
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांना दहा वर्षे खासदार केले. त्यांच्यासाठी जीवाचे रान करून प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासाने अन्य इच्छुकांना बाजूला ठेवून गोडसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र गोडसे हे उपकार विसरून ज्यांच्या भरवशावर शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात गेले, त्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्व कार्यकर्ते पाहत आहेत. ही अवस्था पाहून फार खेद वाटतो. जे लोक काही हेतू ठेवून काम करतात, त्यांच्या पदरात नेहमी निराशाच पडते. मात्र चांगल्या हेतूने काम करणा-यांच्या पदरात नियमित यश येते, असा दावा बडगुजर यांनी केला.