नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यांचे वजन काही दिवसांतच साडेचार किलोने कमी झाल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही स्थिर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, जेल प्रशासनाने मात्र आप नेत्यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत.
केजरीवालांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी काही दिवस ते ईडीच्या कोठडीत होते. त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तिहार जेल प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल जेलमध्ये आले तेव्हा त्यांचे वजन जवळपास ५५ किलो होते. आताही त्यांच्या वजनात फारसा फरक पडलेला नाही. सध्यातरी त्यांची तब्येत ठणठणीत आहे. साखरेची पातळीही सामान्य असून त्यांनी आज सकाळीच योगा आणि ध्यानधारणाही केली.
केजरीवालांना दुपारी आणि रात्री घरचे जेवण दिले जात आहे. त्यांच्या तब्येतीवर सातत्याने लक्ष दिले जात आहे. कोणतीही आपत्कालीन स्थिती उपस्थित झाल्यास त्यांच्या कोठडीजवळच क्वीक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्याची माहिती जेलमधील अधिका-यांनी दिली.