लोकसभा निवडणुकीमध्ये ‘चारशे पार’चे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते सर्व राज्यांमध्ये विविध पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, अनेक राज्यांमध्ये मित्रपक्षांना जागावाटप झाल्याने नाराज झालेल्या आपल्या नेत्यांनाही समजाविले जात आहे. मात्र, ज्या दोन नेत्यांच्या ऊर्जेवर भाजपने देशभरात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे, त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ‘होमपीच’वर अर्थातच गुजरातमध्ये उमेदवार निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
गुजरातमध्ये भाजपने सलग दोन लोकसभा निवडणुकांत सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. यंदाही या निकालाची पुनरावृत्ती करत हॅट्ट्रिक साधण्याचा भाजपचा प्रयत्न करीत असला तरी त्यासाठी त्यांना आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे. अमरेली, राजकोट, साबरकंठा, सुरेंद्रनगर आणि बडोदा या मतदारसंघांमध्ये उमेदवार निवडीवरून भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे उघड झाले आहे.
कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेते बैठकांमागून बैठका घेत आहेत. राजकोटमध्ये भाजपने ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम रुपाला यांना उमेदवारी दिली. मात्र, एका प्रचारसभेत पूर्वीच्या संस्थानिक राजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर भाजपशी एकनिष्ठ असणारा क्षत्रिय समाज नाराज आहे. रुपाला यांच्या जागी दुसरा उमेदवार द्या नाहीतर परिणाम भोगा, असा इशाराच या समुदायाने दिला आहे. याशिवाय, करनी सेनेनेही रुपाला यांच्याविरोधात कंबर कसली आहे.
अमरेली मतदारसंघात भरत सुतारिया यांना उमेदवारी दिल्यावरून भाजपच्याच दोन गटांमध्ये मारामारी झाली. सुतारिया यांना संधी दिल्याबद्दल विद्यमान खासदार नारण कच्छाडिया हे नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र चुडासमा यांना अमरेलीला धाव घ्यावी लागली. बडोद्यातून दोन वेळा लोकसभेवर गेलेले खासदार रंजन भट यांना अंतर्गत वादाचा फटका बसत मिळालेली उमेदवारी सोडावी लागली. त्यांच्या जागी भाजपने हेमांग जोशी यांना रिंगणात उतरविले आहे.
साबरकंठा व सुरेंद्रनगर येथे उमेदवारी दिलेल्या व्यक्ती भाजपमधून बाहेरून आल्या आहेत, या मुद्यावरून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शविला. साबरकंठा येथे भिकाजी ठाकूर यांनी माघार घेतल्यानंतर शोभना बरैया यांना उमेदवारी मिळाली. मात्र, बरैया यांचे पती भाजपमध्ये नुकतेच आले, शोभना यांचा पक्षाशी संबंध नाही, असे म्हणत ठाकूर यांच्या समर्थकांनी निदर्शने केली.
सुरेंद्रनगर येथेही खासदार महेंद्र मुंजपारा यांना वगळून काँग्रेसमधून आलेल्या चंदू शिहोरा यांना उमेदवारी दिल्यावरून कार्यकर्ते नाराज आहेत. उमेदवार न बदलल्यास भाजपचा पराभव करू, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे ही नाराजी दूर झाली नाही तर भाजपला निर्भेळ विजयाची हॅट्ट्रिक साधणे कठीण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.