कोलकाता : वृत्तसंस्था
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील टॉप-४ संघ निश्चित झाले असून, भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानही उपांत्य फेरीच्या शर्यतीत होते. मात्र, कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ते औपचारिकरित्या बाहेर पडले. त्यामुळे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आता थेट मायदेशी परतणार आहे. आता उपांत्य फेरीतील पहिला सामना पुन्हा न्यूझिलंड-भारत यांच्यात १५ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा तोच संघ आहे, ज्यांनी विश्वचषक २०१९ च्या मँचेस्टर उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेतील दोन्ही संघांमध्ये जुने वैर आहे.
अशा स्थितीत रोहितकडे मागील उपांत्य फेरीचा बदला घेण्याची मोठी संधी आहे. यावेळी भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हेदेखील रोहितचे होम ग्राउंड आहे. याच विश्वचषकात भारताने श्रीलंकेला ५५ धावांत गुंडाळून ३०२ धावांनी सामना जिंकला होता. यानंतर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने यापूर्वी ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे तर आफ्रिकेचे हात नेहमीच रिकामे राहिले आहेत. त्यांना चोकर्सचा शिक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेत दुसरी लढत
आफ्रिका संघाने अनेकवेळा चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पण इथे ती चोकर असल्याचे सिद्ध होते आणि हरल्यानंतर बाहेर पडते. मात्र, यावेळी टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिले विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने खेळत आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.