मुंबई : उस्मानाबाद, औरंगाबाद, या शहरांपाठोपाठ आता अलिबाग शहराचे नाव बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण करण्यात यावे असे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. अलिबागचे नाव बदलून ‘मायनाक नगरी’ ठेवावे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारावे अशी मागणीदेखील या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र अलिबागचे नाव बदलण्याच्या या मागणीला खुद्द अलिबाग शहरामधूनच विरोध होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना अतिशय महत्त्व आहे. महाराजांनी दूरदृष्टीने बलाढ्य आरमाराची उभारणी केली. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवल्यास सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती.
अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांनादेखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’हे नामकरण करावे, असे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.