जळगाव : करण पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. लगोलग त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी भाजप नेत्यांना चांगलेच चिमटे घेतले. ते म्हणाले, आमच्यापुढे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान आहे असे आम्ही मानत नाही. स्मिता वाघ या उमेदवार म्हणून शेवटपर्यंत राहतात की, अचानक त्यांची उमेदवारी रद्द होते हे पहावे लागेल.
स्मिता वाघ यांचे तिकिट राहते की जाते याची त्यांना स्वत:लाच शाश्वती नाही. कारण भाजपमध्ये काहीही होऊ शकते. भाजपमधील नेत्यांच्या या लहरीपणाचा कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना कंटाळा आला आहे. भाजपने आजवर निवडणुका जिंकल्या, त्याला शिवसेनेची जोड होती. शिवसेनेच्या बळावरच भाजपला मोठे मताधिक्य मिळत होते, असा दावा पवार यांनी केला.