नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस ठरवणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत राणांना मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. आता त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरवले होते. २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.
नवनीत राणा भाजपच्या कमळावर अमरावतीतून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आज त्या उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत.
गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. ८ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘मोची’ जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मिळवले गेले. अमरावतीच्या खासदाराला २ लाखांचा दंडही ठोठावला होता.