मुंबई : काँग्रेसने रश्मी बर्वे यांना रामटेक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. रश्मी बर्वे यांच्या विरोधात दिलेल्या जातपडताळणी समितीच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांना शेवटच्या घटकेला दिलासा मिळाला असला तरीही निवडणूक लढू देण्याबाबतची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज निवडणूक आयोगाने खारीज केल्याप्रकरणी न्यायालयाने कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
याप्रकरणी नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होईल विशेष म्हणजे तोवर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचे मतदान पार पडलेले असेल. त्यामुळे रश्मी बर्वे यांना निवडणूक लढवता येणार नाही.
जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला असला तरी त्यांची उमेदवारी खारीज केल्याप्रकरणी त्यांना दिलासा मिळालेला नाही.
रामटेक लोकसभा जागा ही एससीसाठी राखीव जागा आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे यांना येथून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर रश्मी बर्वे यांनी बुधवारीच उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर वैशाली देविया यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जात प्रमाणपत्र तपासणी समितीने ते बेकायदेशीर ठरवले आहे. यानंतर रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी विविध पक्षांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता.
रामटेकच्या उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांच्या एबी फॉर्मवर काँग्रेसनेही डमी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव लिहिले होते. जात प्रमाणपत्रावरील आक्षेपामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेल्यास रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे पर्यायी उमेदवार म्हणून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील.