सोलापूर :
होटगी रोड येथील विमानतळाच्या जागेवर संरक्षक भिंतीसाठी हद्द निश्चित करण्याचे काम सुरू असताना नई जिंदगी, नागनाथ नगर येथील रहिवाशांनी विरोध केला होता. दरम्यान, रहिवाशांचे म्हणणे ऐकण्यासाठी प्रांत कार्यालयात बैठक झाली. विमानतळ परिसरात गट क्रमांक ७३, ६४ या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. रस्त्यालगत दुकान असल्यास जाण्या- येण्यासाठी रस्ता सोडू, आतील रस्ते खुले ठेवण्यात येतील, घर आल्यास घरासाठी रस्ता खुला करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, आपली घरे पाडणार या भीतीने प्रांत कार्यालयाबाहेर नई जिंदगी, नागनाथ नगर येथील रहिवासी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोणत्याही परिस्थितीत संरक्षक भिंत बांधू देणार नाही, असा निर्धारच उपस्थितांनी केला आहे.
विमानतळाची ३५ एकर जागा एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या ताब्यात नव्हती. चार महिन्यांपूर्वी या जागेच्या उताऱ्यावर एअरपोर्टचे नाव लागले आहे. या जागेवर एक हजार ते बाराशे घरे आहेत. या जागेचे हस्तांतरण करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात अधिकारी, अतिक्रमण पथक जेसीबी घेऊन गेल्यानंतर एकच गोंधळ झाला होता.याबाबत प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, ‘प्रहार’चे सचिव जमीर शेख, विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.
गट क्र. ७३, ६४ परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्या परिसरात दुकान, घरे आल्यास त्यांच्यासाठी रस्ता सोडू. जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारची दिशाभूल करीत नाही. घरे पाडायची असतील तर नोटीस देऊन पाडू. बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. बैठकीतील निर्णयाचे पत्र दिले आहे.असे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी सांगीतले.
कंपाऊंड बांधायचे असेल तर रहिवाशांना विश्वासात घेऊन बांधायला हवे होते. अचानक सणासुदीच्या काळात कारवाई करीत होते. जिल्हा प्रशासन फिरवाफिरवी करीत आहे.असे प्रहार संघटनेचे सचिवजमीर शेख यांनी सांगीतले.मागील ३० ते ४० वर्षांपासून आम्ही राहतो. आमच्याकडे खरेदीखत, नोटरी आहे. महापालिकेचे टॅक्स भरतो, लाईट आणि महापालिकेची पाईपलाईन आहे.असे रहिवाशांनी सांगीतले.