21.1 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील ६५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

राज्यातील ६५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

                                         

                                          लातूर : एकमत डेस्क

लोकसभा निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोग देखील मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी वेळोवेळी आवाहन करीत आहे. मात्र, असे असले तरीदेखील राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात तब्बल ६५ गावातील ४१ हजार ४४० मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे.

रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वे गाडी सुरू करावी यासह बीड जिल्ह्यातील एका गावाने तर चक्क त्यांच्या गावातील मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. आष्टी तालुक्यातील सुरूर्डी येथे गेल्या वीस वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्याने संतप्त गावक-यांनी बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भातील ठराव ग्रामपंचायतीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

मावळ मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी कोंडीची वाडी येथील ८० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तर, जमिनीच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी हनुमान कोळीवाडा आणि करंजा गावातील ४५० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे.
रस्ते, लाईट, पाणी आणि आरोग्य सुविधांसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रस्ते, पाणी, लाईट आणि आरोग्य या मूलभूत सुविधा नसल्याने फुगाळे आणि दापूर येथील ३ हजार ४६६ मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात सिडकोने जमिन अधिग्रहण करूनही काम पूर्ण न केल्याने जमिन परत करण्याच्या अन्यथा पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी सावली गावातील २० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
मोकाट जनावरांच्या समस्येने त्रस्त असलेल्या बारामतीकरांनी थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी मोढवे गावातील २ हजार ७०० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पान्हवळ गावातील १३०० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच, दौंड शहराला उपनगरचा दर्जा द्यावा, लोकल सुरू करावी आणि उड्डाण पुलाच्या मागणीसाठी ३ हजार ५०० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिरुरमधली निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच भुयारी मार्गाच्या मागणीसाठी खोडद, हिवरे, नारायणगाव गावातील १३०० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उपसा स्ािंचन योजनेसाठी निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी ४० गावातील २५ हजार मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रस्त्याच्या मागणीसाठी औरंगपूर गावातील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी भूकंपानंतर पुनर्वसित झालेल्या गावातील गावक-यांच्या घरकुलाच्या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील धनेगाव येथील ३५९ मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लाहोरा तालुक्यातील होळी गावातील ६०० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच नदीवरील पूल बांधण्याच्या मागणीसाठी परंडा तालुक्यातील कुंभेफळ गावातील ७९५ मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR