21.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्­मीर : ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

जम्मू-काश्­मीर : ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

कलम ३७०, मतदारसंघांची फेररचना या पार्श्वभूमीवरील पहिलीच निवडणूक; नॅशनल कॉन्फरंसचे पारडे जड

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्­मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. अनेक अर्थाने या निवडणुकीला महत्त्व आहे. राज्यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या उमेदवारांमुळे राज्यातील लढत बहुरंगी होण्याचीही शक्यता आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांचे पारडे सध्या तरी जड असल्याचे मानले जात आहे.
काश्­मीरमध्ये सुमारे ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा सूर उमटलेला नाही. काश्­मीरमधील अनंतनाग, श्रीनगर आणि बारामुल्ला येथे अनुक्रमे ७, १३ आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. राज्यात निवडणूक प्रचाराला अद्याप सुरूवात व्हायची आहे, मात्र येथील राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्­चित करण्याची आणि निवडणुकांच्या दृष्टीने प्रचाराचे धोरण आखण्याची लगबग सुरू आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये निवडणुकीपूर्वीच टोकाचे मतभेद दिसून आले. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष जम्मू-काश्­मीरमधील पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन (पीएजीडी) आणि देशपातळीवरील विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेले पक्ष आहेत.

सर्वप्रथम नॅशनल कॉन्फरन्सने कोणत्याही पक्षाबरोबर युती न करता काश्­मीरमधील सर्व जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. काँग्रेसने या तीनही जागांवर नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला असून याबदल्यात जम्मूतील उधमपूर आणि जम्मू या दोन मतदारसंघामध्ये नॅशनल कॉन्फरन्सने उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जम्मू आणि उधमपूर मतदार संघातून भाजपचे जुगल किशोर व जितेंद्र स्ािंह आणि काँग्रेसचे रमण भल्ला आणि लालस्ािंह यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. डॉ. जितेंद्र स्ािंह आणि जुगल किशोर हे दोघेही विद्यमान खासदार आहेत तर लालस्ािंह यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
नॅशनल कॉन्फरन्सच्या वतीने श्रीनगरमध्ये उमर अब्दुल्ला, बारामुल्ला येथून रुहुल्ला मेहदी आणि मिया अल्ताफ हे अनंतनाग-राजौरी येथील संभाव्य उमेदवार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे बारामुल्ला येथील रुहुल्ला मेदही हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे मानले जात आहे. त्यांनी नकार दिला तर बारामुल्ला येथून चौधरी रमजान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

फेररचनेमुळे समीकरणे बदलली
मतदारसंघांच्या फेररचनेमुळे येथील राजकीय समीकरणे देखील बदलली आहेत. नव्याने फेररचना करण्यात आलेल्या अनंतनाग मतदारसंघामध्ये जम्मूमधील राजौरी हा भाग समाविष्ट करण्यात आला. राजौरी येथे मोठ्या संख्येने गुज्जर समुदायाचे मतदार आहेत. त्यामुळेच नॅशनल कॉन्फरन्सने येथे मिया अल्ताफ यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असल्याचे मानले जात आहे. बारामुल्ला मतदार संघामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या बडगाम जिल्ह्यामध्ये शिया मुस्लिमांचे मतदान अधिक प्रमाणावर असल्याने रुहुल्ला यांना येथून उमेदवारी देण्याचा विचार पक्का करण्यात आला. मेहबुबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’ने काश्­मीरमधील तीनही जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. ‘अपनी पार्टी’च्या अश्रफ मीर यांना श्रीनगर येथून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्­चित आहे.

कलम ३७० प्रचाराच्या केंद्रस्थानी
जम्मू-काश्­मीरमध्ये या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा असणार आहे. कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्­मीरमधील परिस्थितीमध्ये कशापद्धतीने सकारात्मक बदल घडून आले आहेत हे येथील जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. तर विरोधी पक्षांच्या प्रचारामध्ये ३७० कलम रद्द केल्याने राज्याचे कसे नुकसान झाले, यासह जम्मू-काश्­मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी याचाही समावेश आहे.

बहुरंगी लढती होणार
भाजप, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्याशिवाय गुलाम नबी आझाद यांचा डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष, अल्ताफ बुखारी यांचा अपनी पार्टी आणि पीपल्स कॉन्फरन्स या पक्षांच्या आघाडीमुळे निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. या पक्षांचे उमेदवार विजयी झाले नाहीत तरी ते निकालावर प्रभाव पाडू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR