23.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeराष्ट्रीयआंबा उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वलस्थानी

आंबा उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वलस्थानी

महाराष्ट्राचा पहिल्या ५ मध्ये समावेश नाही अनेक देशात आंब्याची निर्यातही वाढली

नवी दिल्ली : आंबा म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कारण आंबा हे सर्रास सगळ्यांच्याच आवडीचे फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात. सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. विविध ठिकाणच्या बाजारात आंबा दाखल होत आहे. मात्र, सुरुवातीचा काळ असल्याने आंब्याची आवक कमी आहे, त्यामुळे बाजारात आंब्याच्या दरात सध्या तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, देशात सर्वात जास्त आंब्याच उत्पादन उत्तर प्रदेशात होते.

लोक आंब्याचा वेगवेगळा उपयोग करतात. फळ म्हणून आंबा खातात. त्याचबरोर रसापासून ज्यूस करतात. तसेच आंब्याची चटणी, लोणचेही तयार केले जाते. तसेच आंबा आरोग्यासाठी देखील चांगला आहे. दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होते. भारतातून अनेक देशात आंब्याची निर्यातही केली जाते. भारत देशात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन हे उत्तर प्रदेशात होते. उत्तर प्रदेशमधील वातावरण आंबा उत्पादनासाठी पोषक आहे. तेथील माती आणि पाणी आंब्याच्या बागांसाठी चांगले आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त आंब्यात उत्पादन तिथे होते. देशाच्या एकूण आंबा उत्पादनात २०.८५ टक्के उत्पादन हे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये होते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही उत्तर प्रदेशमधून केली जाते.

आंध्र प्रदेशात २०.०४ टक्के उत्पादन
आंबा उत्पादनात उत्तर प्रदेशनंतर आंध्र प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. आंध्र प्रदेशात देखील मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. आंध्र प्रदेशचा आंबा सुगंध आणि गोड चवीसाठी ओळखला जातो. देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी २०.०४ टक्के उत्पादन हे एकट्या आंध्र प्रदेशात होते.

बिहारमध्ये ११.१९ टक्के उत्पादन
आंबा उत्पादनात उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशनंतर बिहारचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील एकूण आंबा उत्पादनापैकी ११.१९ टक्के उत्पादन हे एकट्या बिहारमध्ये होते.

कर्नाटक चौथ्या क्रमांकावर
बिहारनंतर आंबा उत्पादनात कर्नाटक राज्याचा चौथा क्रमांक लागतो. देशातील एकूण उत्पादनापैकी कर्नाटक राज्यात ८.०६ टक्के उत्पादन होते.

तामिळनाडू उत्पादनात पाचव्या स्थानी
कर्नाटकनंतर आंबा उत्पादनात तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो. तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानी आहे. येथील शेतकरी दरवर्षी ५.६५ टक्के आंब्याचे उत्पादन घेतात.

महाराष्ट्रात कोकण अव्वल
उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यात देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ६५ टक्के उत्पादन होते. म्हणजे फक्त ३५ टक्के आंब्याचे उत्पादन हे इतर राज्यात घेतले जाते. महाराष्ट्रात देखील आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कोकण विभागात आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. दरम्यान, पहिला पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही. आंबा हा आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR