नवी दिल्ली : बर्ड फ्लू एच ५ एन १ च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, हा नवीन आजार कोरोना महामारीपेक्षा १०० पट जास्त धोकादायक ठरू शकतो. या फ्लूमुळे निम्म्याहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यांनी भीती व्यक्त केली आहे की, व्हायरसच्या संसर्गाची पातळी तीव्र होऊ शकते ज्यामुळे जागतिक महामारीचा जन्म होऊ शकतो.
पिट्सबर्गमधील प्रमुख बर्ड फ्लू संशोधक डॉ. सुरेश कुचिपुडी यांनी इशारा दिला आहे की एच ५ एन १ मध्ये साथीचा रोग निर्माण होण्याची क्षमता आहे. याचे कारण असे की त्यात मानवांना तसेच अनेक सस्तन प्राण्यांना संक्रमित करण्याची क्षमता आहे. फार्मास्युटिकल उद्योग सल्लागार आणि कॅनडा-आधारित फार्मास्युटिकल कंपनी बायोनियाग्राचे संस्थापक जॉन फुल्टन यांनी देखील हीचचिंता व्यक्त केली आहे. एच ५ एन १ ने महामारीचे रूप धारण केलं तर ते खूप गंभीर असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. हा कोरोनापेक्षा जास्त प्राणघातक असू शकतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, २००३ पासून एच ५ एन १ बर्ड फ्लूची लागण झालेल्या प्रत्येक १०० रुग्णांपैकी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८८७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी एकूण ४६२ मृत्यू झाले आहेत. त्याच वेळी, कोविड-१९ ची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू दर ०.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तथापि, साथीच्या रोगाच्या सुरूवातीस ते सुमारे २० टक्के होते.
एच ५ एन १ म्हणजे काय?
लाइव्ह सायन्समधील रिपोर्टनुसार, एच ५ एन १ हा एवियन इन्फ्लूएंझा ए चा उपप्रकार आहे. हा बर्ड फ्लू व्हायरसचा समूह आहे. हे अत्यंत रोगजनक मानलं जातं कारण यामुळे पोल्ट्रीमध्ये गंभीर आणि अनेकदा प्राणघातक रोग होतो. प्रामुख्याने पक्ष्यांना होतो. ऌ5ठ1 वन्य पक्षी आणि कधीकधी मानवांसह सस्तन प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. हा रोग मानव आणि प्राण्यांसाठी घातक ठरू शकतो. एच ५ एन १व्हायरस पहिल्यांदा १९९६ मध्ये चीनमध्ये पक्ष्यांमध्ये आढळून आला होता. एका वर्षानंतर हाँगकाँगमध्ये उद्रेक झाला.