मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरुन झाले तरी महाविकास आघाडीकडून अद्याप आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा असल्यामुळे त्यांचा निर्णय प्रलंबित आहे.
शरद पवार गटाकडूनही आतापर्यंत त्यांच्या वाट्याला आलेल्या १० पैकी सात जागांवरील उमेदवारच जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, आता उर्वरित तीन उमेदवारांची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे. शरद पवार गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात येईल. यामध्ये सातारा, रावेर आणि माढा मतदारसंघातील तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल. यापैकी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप इच्छूक असल्याची माहिती आहे. तर सातारा लोकसभेतून शशिकांत शिंदे, सुनील मानेकिंवा पृथ्वीराज चव्हाण ंिरगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पवारांकडून चव्हाणांना ‘तुतारी’वर लढण्याचा आग्रह
सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह शरद पवार यांनी केला आहे. पुण्यात अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना पवारांनी हे वक्तव्य केले. सातारा संदर्भात देखील निर्णय झाला आहे. साता-यातील जागा आम्ही सोडणार नाही. आमच्या चिन्हावर लढणार असतील तर पृथ्वीराज चव्हाण यांचा विचार होऊ शकतो, असे शरद पवार यांनी सांगितले.