21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार

प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे फडणवीसांचे आवाहन

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिवसेना शिंदे गटाकडे असतील. नाशिक अजित पवार गटाकडे जाण्याचे चिन्ह असले तरी तेथे महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ठाणे आम्हालाच हवे, असा प्रचंड आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला आहे. दहाएक जागांवर असलेला महायुतीचा तिढा आता दोन-तीन जागांवर आला आहे. यातच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी ठाणे आणि कल्याण येथील जागेवरून देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. भाजपाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या पाठिशी भाजपा खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागील वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे मग त्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा ही महायुती त्यांना निवडून आणेल, हा विश्वास व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साताराची जागा अजित पवार गटाला मिळणार नाही, ही जागा भाजपकडे जाईल आणि तिथे उदयनराजे भोसले उमेदवार असतील, असे भाजपच्या गोटातून समजते. नाशिकची जागा छगन भुजबळांसाठी आम्हाला द्या, यासाठी अजित पवार गट अडून बसला आहे. विद्यमान खासदार शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांनी ही जागा आम्हालाच मिळणार असे ठामपणे सांगितले आहे. दोन्ही गटांत खूपच ताणले गेले तर ही जागा आम्हाला द्या, असे ऐनवेळी भाजप म्हणू शकते, असे म्हटले जात आहे. उत्तर-पश्चिम मुंबईची जागा शिंदेसेनेला मिळू शकते. रत्नागिरी-सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळेल. औरंगाबाद शिंदेसेनेकडे गेले असून रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR