बीड : बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर मेटे या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी दाट शक्यता आहे. बीडमध्ये विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचे तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.
पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये ज्योती मेटे या निवडणूक लढवतील असे बोलले जात होते. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. ज्योती मेटे यांचे तिकीट निश्चित मानले जात असताना काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. पक्ष सोनवणेंना तिकीट देणार की मेटेंना? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली.