24.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeसोलापूरसोलापुरात राजकीय पक्षांची शक्तिपरीक्षा

सोलापुरात राजकीय पक्षांची शक्तिपरीक्षा

रणजित जोशी : सोलापूर
सोलापूर लोकसभा मतदारसंघाची लढाई टोकदार होत असून राजकीय सत्तासंघर्षाला रंग चढू लागला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने अक्कलकोट तालुक्यातील राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली असून एमआयएमकडून मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे नाव चर्चेत आहे.

भाजपचे राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. प्रणिती शिंदे यांना आधी भाजपची ऑफर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्यांनी त्या सगळ्या चर्चांना बाजूला ठेवून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघाचे दौरे, गावभेटी बैठका घेत प्रचार सुरू केला आहे.

प्रणिती यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य इथून विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा प्रणिती यांनी माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये भाजपची लाट असताना विधानसभा निवडणुकीत दुस-यांदा विजय मिळवला, तर २०१९ मध्ये प्रणिती शिंदेंनी आमदारकीची हॅट्ट्रिक केली. सध्या प्रणिती या राष्ट्रीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. आता २०१४ मध्ये काँग्रेसने प्रणिती शिंदेंना पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही नेते तरुण नेतृत्व आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. प्रणिती शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात दौरे करून जनसंपर्क वाढविला आहे. राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १ लाख ७० हजार मते घेत जोरदार लढत दिली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मागील दोन खासदारांनी काम न केल्याची नाराजी मतदारांमध्ये असून ही नाराजी दूर करण्याचे आव्हान राम सातपुतेंपुढे आहे.

निवडणुकीत मतविभाजनाचा खेळ हा गेमचेंजर ठरणार असून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचे उमेदवार किती मते खेचतात यावरही निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघावर वर्चस्वासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून राजकीय घमासानीला वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे खुद्द प्रकाश आंबेडकर हेच या जागेवर उभे होते. आंबेडकरांना १ लाख ७० हजार मते मिळाली होती. आंबेडकरांच्या या मतांमुळे सोलापूरचे तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले होते. येथे जयसिद्धेश्वर स्वामी यांचा विजय झाला होता. यावेळीदेखील वंचित येथून आपला उमेदवार उभा करणार असल्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दुसरीकडे एमआयएमनेही मैदानात उडी घ्यायचे ठरवल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR