29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावतीत नवनीत राणांसमोर आव्हान!

अमरावतीत नवनीत राणांसमोर आव्हान!

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मागील ५ वर्षांत आक्रमक भूमिका घेऊन महायुतीतील पक्षांसह विरोधकांनाही थेट लक्ष्य करून नाराजी ओढवून घेतली. अलिकडे भाजपचे पाठबळ मिळताच त्यांनी कोणालाही जुमानले नाही. त्यामुळे आता त्यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. परंतु भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट) यांच्यासह प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना हे आवडले नाही.

नाइलाजाने भाजपने साथ दिली असली तरी शिंदे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि प्रहारचा विरोध आहे. एकीकडे स्वकीयांचा विरोध आणि दुसरीकडे समोर तगडा विरोधक आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
अमरावतीत महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असून, येथे काँग्रेसने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना मैदानात उतरविले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे ३ आमदार आहेत आणि यशोमती ठाकूर यांच्यासारखे खंबीर नेतृत्वही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची शक्ती वानखडे यांच्यामागे उभी राहिली आहे. यातच प्रहारचे बच्चू कडू नवनीत राणांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनीही उमेदवार मैदानात उतरवून राणा यांना आव्हान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडीनेही प्राजक्ता पिल्लेवान यांना मैदानात उतरवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हेही अपक्ष मैदानात उतरल्याने त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता येथे बहुरंगी लढत होत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.

मुळात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना स्वपक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचाच विरोध आहे. उमेदवारी जाहीर होण्याअगोदर भाजपचे नेतेही त्यांच्या विरोधात होते. परंतु कोणालाही न जुमानता भाजप पक्षश्रेष्ठींनी नवनीत राणा यांनाच मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचे नेते नवनीत राणा यांच्या मागे उभे राहिले. परंतु राष्ट्रवादीचे संजय खोडके हातचा राखून भूमिका घेत आहेत, तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजीत आडसूळ हे तर नवनीत राणा यांचे कट्टर विरोधक आहेत. कारण २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला होता. त्यामुळे अभिजीत आडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच महायुतीसोबत असलेले आमदार बच्चू कडूही नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे दुखावले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांना आता स्वकीय आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी लढा द्यावा लागत आहे.

अमरावतीत भाजपला मैदानात उतरायचे होते. परंतु त्यांच्याकडे तोडीस तोड उमेदवार नव्हता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून येऊनही मागील ५ वर्षे सोबत राहिलेल्या नवनीत राणा यांना बळ देण्याची भूमिका भाजपने घेतली. त्यामुळे आता सर्वच नेते कामाला लागले असून, नवनीत राणा यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात भाजपसह मित्रपक्षांची कितपत सर्वशक्तीनिशी साथ मिळते, यावर नवनीत राणा यांचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, या निवडणुकीत त्या चौफेर चक्रव्यूहात अडकल्या आहेत.

मतदारसंघनिहाय बळ : अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. ६ पैकी अमरावती, तेवसा आणि दर्यापूर या तीन मतदारसंघांत अनुक्रमे सुलभा खोडके, यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी दर्यापूरचे आमदार वानखडे लोकसभेच्या मैदानात आहेत. याशिवाय मेळघाट आणि अचलपूरमध्ये अनुक्रमे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू हे दोन आमदार प्रहारचे आहेत आणि एकट्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे रवी राणा म्हणजेच नवनीत राणा यांचे पती आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपने कितीही ताकद लावली तरी त्यांच्यासाठी ही लढत सोपी नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR