अहमदाबाद : दिवाळी आणि छठ पूजेसाठी आपल्या घरी जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे व्यवस्थेचा पर्दाफाश केला आहे. सध्या सणासुदीचा काळ असून स्थानकांवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. आरक्षण करूनही अनेकजण ट्रेन चुकवत आहेत. ट्रेनमध्येही तीच स्थिती आहे. पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हीडीओ व्हायरल होत आहेत ज्यात ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच, डब्यांच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. अशात सुरत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वे स्थानकांवर चेंगराचेंगरी झाली असून यामुळे एकाचा मृत्यू तर अनेक जण बेशुद्ध झाले.
सुरतमध्ये स्टेशनवर एवढी गर्दी होती की, ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरत रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत पश्चिम रेल्वे वडोदरा येथील पोलीस अधीक्षक सरोजिनी कुमारी यांनी सांगितले की, सुरत रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक बेशुद्ध झाले. वडोदराच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने (डीआरएम) सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत रेल्वे पोलिसांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले आहे.
सुरतमध्ये शनिवारी प्रवाशांचा मोठा जमाव बिहारला जाणार्या विशेष ट्रेनमध्ये जाण्यासाठी आतुर होता. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, त्यात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पोलिसांनीही बेशुद्ध पडण्याच्या अनेक घटनांना दुजोरा दिला आहे. अशीच परिस्थिती राष्ट्रीय राजधानीतील रेल्वे स्थानकांवर दिसून आली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमध्ये नवी दिल्लीची स्थानके खचाखच भरलेली दिसत आहे.