परभणी : शहरात मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी सकाळ पासून थंडगार वारे वाहत होते. दिवसभर उष्णतेचा पारा देखील कमीच होता. शहरात ५ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरीकांना मात्र मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
शहरात सकाळ पासून थंडगार वारे वाहण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता. शहरात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वा-यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ६ वाजेपर्यंत सुरूच होता. दरम्यान वनामकृविच्या हवामान विभागाने परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. या इशा-याप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांची मात्र तारांबळ उडाली. दरम्यान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. परंतू अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा शोधावा लागला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागला.