नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या जिवाला धोका असल्याचा रिपोर्ट दिला आहे. यामुळे खळबळ उडाली असून गृह मंत्रालयाने तातडीने हालचाली करत कुमार यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे.
तृणमूलसह अन्य विरोधी पक्ष निवडणुकीत अशांतता पसरवत असल्याचे पाहून आयबीने थ्रेट परसेप्शन रिपोर्ट दिला होता. यावरून आयुक्तांना झेड सुरक्षा पुरविण्यात आली आहे. झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एकूण ३३ गार्ड तैनात असतात. यापैकी आर्म्ड फोर्सचे १० जवान हे त्या व्यक्तीच्या निवासस्थानी तैनात असतात. ६ राऊंड द क्लॉक पीएसओ, १२ आर्म्ड स्कॉट कमांडो, दोन वॉचर्स आणि ३ ट्रेन्ड ड्रायव्हर शिफ्टमध्ये तैनात असतात.
मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य आयुक्तांचा कार्यकाळ हा सहा वर्षांसाठी असतो. त्यांचे सेवानिवृत्ती वय हे ६५ व ६२ वर्षे अनुक्रमे असते. त्यांचे वेतन हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसारखेच असते. त्यांना संसदेत महाभियोग आणूनच हटविता येते. त्यांच्याकडे विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुका घेण्याचे अधिकार असतात.