सोलापूर – हिंदुनववर्षाच्या निमित्ताने सुराज्याची मुहूर्तमेढ करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ , हिंदु जनजागृती समिती , मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, हिंदुत्वनिष्ट संघटना आणि धर्मप्रेमी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि उत्तरप्रदेश राज्यांमध्ये सुमारे ३३८ ठिकाणी, तर सोलापूर जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गुढी उभारून गुढीपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी अनेक ठिकाणी मंदिरांची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. गुढी पूजनानंतर सर्वांनी एकत्र येऊन सुराज्य स्थापन करण्याची सामूहिक शपथ घेतली, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघा चे समन्वयक तथा हिंदु जनजागृती समिती चे महाराष्ट्रआणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली.
सामूहिक गुढी महाराष्ट्रात २३९, कर्नाटकात ६०, गोव्यात ३५, तर उत्तर प्रदेश राज्यात ४ ठिकाणी उभारण्यात आली. सामूहिक गुढी उभारण्यात पुणे येथील ज्योतिर्लिंगश्री भीमाशंकर देवस्थान, छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिर्लिंगश्री घृष्णेश्वर देवस्थान, ओझर (पुणे) येथील श्रीविघ्नहर गणपती मंदिर, सोलापूर येथील पूर्वभाग दत्त मंदिरांसह अनेक मंदिरांनी पुढाकार घेतला. तसेच काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी, चौकात, मैदानात सामूहिक गुढी उभारण्यात आली. श्री घृष्णेश्वरज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये रामराज्याच्या स्थापनेसाठी, तसेच रामराज्यासाठी लढणार्या सर्व धर्मप्रेमींना शक्ती मिळावी म्हणून भगवान शंकराला अभिषेक घालण्यातआला. यात विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गुढी उभारण्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त आणि लक्षणिय सहभाग होता. मुंबई-पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखे च्या मुलींनी स्वसंरक्षणाची काही प्रात्याक्षिके दाखवली. तसेच राज्यभर अनेक हिंदु नववर्ष शोभायात्रांमध्ये सहभाग घेतला.