लातूर : प्रतिनिधी
देशातील जनतेचा विद्यमान सत्ताधा-यांवर प्रचंड राग आहे. या परिस्थितीत परिवर्तन घडावे म्हणून आज राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे व आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिका-यांनी मिळून मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने लातूर येथील ऐतिहासिक काँग्रेस भवन येथे, मोठा गाजावाजा करीत विजयी संकल्प गुढी उभारली.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, महागाई कमी व्हावी, संविधान सुरक्षित रहावे, लोकशाही मजबूत व्हावी, लातुर लोकसभा मतदार संघात नवीन उद्योग यावेत, महिलांची सुरक्षितता वाढावी, जनतेला आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे, पाणी टंचाई दूर व्हावी असे अनेक संकल्प करीत परिवर्तनाची विजयी संकल्प गुढी उभारली आहे. आजच्या दिवशी केलेला संकल्प पूर्णत्वास जातो अशी आमची श्रद्धा आहे. असेही आमदार देशमुख यांना म्हटले आहे.
याप्रसंगी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शेटे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, मदन काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर महानगर प्रमुख सुनील बसपुरे, लातूर शहर प्रमुख विष्णू साठे, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, अभय साळुंके, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक सर्जेराव मोरे, अशोक गोविंदपुरकर, एकनाथ पाटील, आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष विविध पदाधिकारी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अबाधित राखायचे आहे, या गुढीपाडव्यानिमित्त आपण संकल्प करूया देशात इंडिया आघाडीचे व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणू लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करावे, पेटती मशाल हतात घेऊन वाजवू या विजयाची तुतारी असे सांगून त्यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शेटे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर महानगर प्रमुख सुनील बसपुरे शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. लातूर शहरातील बस स्टॅन्डसमोरील राहुल जाधव व ओमकार सोमवंशी यांच्या फार्मर चायवाला या दुकानाला व राजू गवळी यांच्या नंदनवन पान शॉपला भेट देऊन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यापा-यांशी संवाद साधला.