मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा जिल्ह्यात अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. परंतु सुदैवाने यातून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत.
विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौ-यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भंडाराजवळ आमच्या गाडीला एका ट्रकने जाणीवपूर्वक धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी एका बाजूने घासत पुढे गेली. या अपघातामध्ये मला काहीही झालेलं नाही. परंतु गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे मी व्यवस्थित आहे. काळजी करण्याचं कारण नाही, या अपघाताबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, हा अपघात आहे की घातपात, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर सत्य काय आहे ते बाहेर येईल असेही नाना पटोले म्हणाले. अपघातासंदर्भात नाना पटोले यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.