मुंबई : चित्रपट निमार्ता-दिग्दर्शक अनीस बज्मी सध्या त्याचा आगामी ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, अनीस आणखी एका हॉरर चित्रपटावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनीसच्या या हॉरर चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘भूतियापा’ असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रोजेक्टसाठी अनीस आणि आयुष्मानची बोलणी सुरू असल्याचं बोललं जात आहे.
भूल भुलैया ३ व्यतिरिक्त दिग्दर्शक अनीस बज्मी नो एंट्री २ मध्ये देखील काम करत आहेत. मात्र, सध्या त्याचे संपूर्ण लक्ष भूल भुलैया ३ वर आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्याशिवाय विद्या बालन आणि तृप्ती डिमरीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. भूल भुलैया च्या पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता, मात्र भूल भुलैया २ मध्ये बज्मी यांनी कार्तिकला संधी दिली होती. त्यानंतर तो भूल भुलैया ३ मध्येही दिसणार आहे. नो एंट्री २ बद्दल बोलायचे झाले तर अभिनेता वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
आयुष्मान खुरानाने आपल्या एक दशकाच्या चित्रपट कारकिर्दीत विविध विषयांवरील चित्रपटात काम केले. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर त्याला चित्रपटात संधी मिळाली. आयुष्मानने आतापर्यंत मनोरंजन क्षेत्रामध्ये विविध स्तरावर काम केले आहे. शिवाय तो उत्तम गायकही आहे. आयुष्मानच्या पुढील चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. जर ही बातमी खरी ठरली आणि अनीसच्या चित्रपटात आयुष्मान दिसला तर ती त्याच्या चाहत्यांना एक भेट असेल.