छत्रपती संभाजीनगर/अकोला : मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट असताना विदर्भ- मराठवाड्याला दोन दिवसांत अवकाळी पावसाने झोडपून काढले. गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे संत्रा, लिंबू, चिकू, आंबा, केळी, पपई, टरबूज या फळपिकांसह उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी, गहू पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने संबंधित जिल्हा प्रशासनास दिले आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी गारपीट झाली.
जालना, बीड, लातूर जिल्ह्यात गुरुवारी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. हिंगोलीत नर्सी नामदेव शिवारात झाडावरील चाळीस बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिला हरिबाई एकनाथ सुरनर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. शेळगाव येथे एका शेतक-याच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला.
विदर्भात पावसाची सर
विदर्भात बुधवारपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही कायम होता. नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये गुरुवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भात गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिम व-हाडात पिकांचे नुकसान
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात ८ आणि ९ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ८० गावांना पावसाचा फटका बसला.
नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश
राज्याच्या अनेक भागांत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्यासाह विविध फळपिकांचे नुकसान झाले असून, संबंधित जिल्हा प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. जळगावात अनेक केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. विदर्भात नागपूर, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, भंडारा, तर मराठवाड्यात ंिहगोली, उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.