27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदोन जागांवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

दोन जागांवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

मुंबई : लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद काही संपताना दिसत नाही. मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतले नाही असा आरोप करत वर्षा गायकवाडांनी स्वपक्षावरच नाराजी बोलून दाखवली.

राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मुंबईतल्या जागांसाठी फारसा आग्रह धरला नसल्याचा आरोपही वर्षा गायकवाडांनी केला. वर्षा गायकवाड यांनी मुंबईतल्या जागावाटपाबाबतची तक्रार दिल्लीत हायकमांडकडेही केली. दुसरीकडे सांगलीवरुनही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कुस्ती रंगली. सांगलीत उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केला. शिवसेनेची कोल्हापूरची जागा शाहू महाराजांमुळे काँग्रेसकडे गेली. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा असावी म्हणून सांगलीची जागा मागितल्याचा दावा ठाकरे गटाने केला. सांगली हा स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला. तेव्हा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नसताना दुसरीकडे काँग्रेसची ताकद आणि संघटनाही असताना सांगलीची जागा ठाकरे गटाला का असा सवाल काँग्रेस नेते करत आहेत.

मविआ नेत्याने फूस लावली?
दुसरीकडे मविआतल्याच एका नेत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला फूस लावल्याचा संशय काँग्रेस नेत्यांना आहे. या नेत्याला सांगलीत काँग्रेसचं वर्चस्व नको असल्याचा आरोपही सांगली जिल्ह्यातले नेते खासगीत करत आहेत. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांचीही भेट घेतली. त्यामुळे विशाल पाटील आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याचीही चर्चा सुरु झाली. सांगलीत ठाकरे गटाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे सांगलीचे स्थानिक काँग्रेस नेते मात्र ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात उभे ठाकले आहेत. मविआतल्या नाराजीनाट्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.

अमित शहांना प्रत्युत्तर
राज्यात दोन नकली पक्ष, एक शिवसेना दुसरी राष्ट्रवादी असे म्हणत अमित शाहांनी उद्धव ठाकरे आणि पवारांना डिवचले. यावरून जयंत पाटलांनी शाहांना प्रत्युत्तर दिले आहे. एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचे. आता जनतेलाच ठरवू दे कोण नकली आणि कोण असली, असा टोला जयंत पाटलांनी लगावला. तर २०१९ साली पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर नाक रगडत का आला होता? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. शाहांनी डुप्लिकेट पक्ष स्थापन केलेत त्याचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही असा पलटवार राऊतांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR