मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी मुलगा अमोल किर्तीकर यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. गजानन किर्तीकर आज (११ एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा असताना ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजे, ईडीमुळे लोकांमध्ये चीड निर्माण होत आहे. ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही, असे खासदार गजानन किर्तीकर म्हणाले आहेत.
शिवसेना-भाजपाच्या युतीमधून मी खासदार झालो, याची मला जाणीव आहे. त्यामुळे युतीधर्म मी पाळलेला आहे. मी १० वर्ष खासदार असताना फार महत्वाचे स्थित्यंतर दिल्लीत पाहायला मिळाली. ३७० कलम, जीएसटी, तिहेरी तलाक, राम मंदिर, अशा अनेक प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले. ते काम मी जवळून पाहिले. या सर्व गोष्टीमुळे आमची इच्छा आहे की, नरेंद्र मोदी यांनी पाच नाही तर १० वर्ष पंतप्रधान पदावर राहावे. देशातील जनता पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी राहील. मात्र, ४०० पारचा जो नारा लावला, त्यामध्ये कुठेतरी दर्प येता कामा नये असे गजानन किर्तीकर म्हणाले.
ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही
महायुतीमध्ये शिवसेना आहे. शिवसेनेची मोठी व्होट बँक आहे. याचा फायदा महायुतीमधील उमेदवाराला होत असतो. त्यामुळे आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही. येवढा भक्कम पांिठबा देशामधून भाजपाला आहे. ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. लोक ईडीच्या कारवाईला कंटाळले आहेत. त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असे गजानन किर्तीकर म्हणाले.