कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना वेगवेगळ्या मुद्यांवर महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांना लक्ष्य करीत आहेत. राज्यात नव्याने होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमी संपादनावरून शेतक-यांमध्ये संतापाची लाट आहे. या मुद्यांचा खुबीने राजकीय वापर करून घेतला जात असून काँग्रेसच्या प्रचारात तो प्रकर्षाने मांडला जात आहे. भाजपला टीकेचा केंद्रबिंदूू बनवला जात आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही दोघांवर फटकरे ओढले आहेत. या तापलेल्या वातावरणाचा काही मतदारसंघाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.
राज्यात नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग साकारला जाणार आहे. त्यासाठी २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भूमी संपादनाचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. यापूर्वी मुंबई झ्र नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग साकारला जात असतानाही शेतकरी, जमीनधारकांनी समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारलेले होते. अनेक ठिकाणी आंदोलने होऊन शेतक-यांना अटक, गुन्हे दाखल असे प्रकारही घडले होते. याच धर्तीवर शक्तिपीठ महामार्ग जात असलेल्या भागातूनही या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटला जात आहे.