पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. आम्ही वेगळी भूमिका घेतल्यानंतर शरद पवार हे भाजपसोबत येण्यास ५० टक्के तयार होते, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यानंतर छगन भुजबळ यांनीही पटेल यांच्या दाव्याला दुजोरा देत शरद पवारांनी २०१४ सालीच भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला. या आरोपांना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांवर पलटवार करताना जयंत पाटील म्हणाले की, काही नेते भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांना विनंती करत होते. मात्र पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच तर त्या नेत्यांची अडचण होती. ते तयार असते तर भाजपसोबत गेलेच असते. शरद पवारांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला, पण काहीही किंमत मोजावी लागली तरी विचारणी सोडायची नाही, हे पवारसाहेबांनी ठरवले होते असे पाटील यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेलांनी म्हटले की मुंबईत झालेल्या बैठकीनंतर पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक झाली. कुठेतरी असे संकेत मिळत होते की आमची आणि त्यांची बोलणी चालू होती आणि तेही ५० टक्के तयार होते असा दावा पटेल यांनी केला.
भुजबळांचा काय आहे आरोप?
प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याविषयी प्रश्न विचारताच छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की प्रफुल्ल पटेल नेमके काय बोलले हे ऐकले नाही. मात्र, शरद पवारांनी आधीही भाजपाप्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ च्या निवडणुकीत शरद पवारांनी तसा प्रयत्न केला होता. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये बिनसले. भाजपचे बहुमतापेक्षा थोडे कमी आमदार होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे सगळे चालले आहे असे छगन भुजबळ यांनी सांगितले.